!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१११ ) १७ मार्च २०२२
आमचा कालचा मुक्काम हरदा जिल्ह्यातील मनोहरपुरा येथे होता. काल एकदम कमी अंतर चालल्यामुळे आज सकाळी लवकर जायचे ठरवले.रस्ता विचारुन घेतला मार्गक्रमण सुरु झाले. प्रत्यक्ष रस्ताच सापडेना. "नर्मदे हर" चा गजर करुनही सकाळची वेळ असल्याने मार्ग दाखवण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते. आम्ही दोन वेळा रस्ता भरकटलो. एक वेळ तर अशी आली की पुढील मार्ग काट्या लावून बंद केला होता. अडचणीच्या काळात आमच्याकडचा दंड अनेक भूमिका पार पाडतो, त्यांनी आम्हास रस्ता तयार करुन दिला. ओढे नाले पार करत भमोरी गाव गाठले त्याचवेळी आता आपली सुटका झाली असे आम्हाला वाटले.
रस्त्याबाबत मला असे म्हणावेसे वाटते. " Man proposes but Road disposes." कधी रस्ता चांगला असतो तर कधी परीक्षा घेणारा असतो असेच म्हणावे लागेल. आज वाटेत भमोरा, हंडीया, मांगरुल, रातातलाई, पचौला, कचबेडी, जामली ही महत्वाची गावे लागली. आज पाचातलाई येथे भजनलाल विश्नोई यांच्या घरी थांबलो आहोत. ते आपल्या घरीच मा नर्मदा रेवा आश्रमदेखील चालवतात. भजनलाल विश्नोई हे सध्या नर्मदा परिक्रमेत आहेत. परिक्रमेत त्यांची आमची अनेक वेळा भेट झाली. स्नेह जुळून आला त्याचा परिणाम म्हणून
आम्ही जाणीवपूर्वक त्यांच्या आश्रमात मुक्कामासाठी आलो आहोत. त्यांचे चिरंजीव अनिकेत यांनी आमचे स्वागत केले. परिक्रमेत नेहमीच संमिश्र अनुभव येतात. कटू गोड अनुभव घेऊनच वाटचाल करावयाची असते. लोक आदरातिथ्यही करतात त्याचबरोबर कसलीच विचारपूसदेखील करत नाहीत. आज पचौला गावात सौ.गीताबाई धनगर व काशीप्रसाद धनगर यांनी दुपारचे भोजन दिले तर कचबेडी येथील विश्वकर्मा यांनी कडक उन्हात लिंबू सरबत देऊन थंड केले.
जामली गावात आम्ही थांबावे यासाठी प्रभूदयाल पवार यांनी खूपच आग्रह केला होता परंतु पूर्व नियोजनामुळे आम्ही थांबलो नाही. येथील शेती खूपच प्रगत आहे. सध्या गहू कापनीचे तसेच हरभरा काढणीचे काम जोरात चालू आहे. गहू, हरभरा पिकाबाबत नंतर स्वतंत्रपणे माहिती सांगेन. आज एका ठिकाणी मिरचीचा मोठा प्लॉट पाहण्यात आला. थोडक्यात कॅश क्रॉपवरदेखील चांगलाच जोर दिसत आहे.
आज दुपारी १२.३० वाजता आलेला अनुभव तुम्हाला सांगितलाच पाहिजे. रातातलाई आणि पचौला गावाच्या दरम्यान जंगलात हनुमान टेकडीवर एक आश्रम आहे. तेथे भोजन प्रसाद मिळेल या आशेने आम्ही गेलो होतो. तेथील महाराज निवांत कॉटवर लोळत पडले होते. त्यांनी उठण्याचा त्रासही घेतला नाही. आसन कोठे लावावे असे विचारले असता, शेजारीच गाय बांधली होती ती जागा निर्देशित केली. आमची कसलीच विचारपूस केली नाही. भोजनाबाबत तर विचारले नाहीच,अशा वेळी राग येणे साहजिक आहे परंतु परिक्रमेने आम्हास चांगलाच संयम शिकविला आहे जे वाट्याला येईल ते निमूटपणे सहन करायचे.
आपल्या जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपला संयम सुटतो. सुटलेल्या संयमामुळे प्रतिकूल परिणाम आपणावर होतो. आपलेच नुकसान होते म्हणून आपला संयम कधीच सुटू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा